गुरुवार, २६ नोव्हेंबर, २०२०

सुधा मला तुझ्याच हातचं जेवण हवं ग!



 #सुधा_मला_तुझ्याच_हातच_जेवण_हवं_ग!


आज सुधाला जाऊन पंधरा दिवस झाले. शामराव एकटेच व्हरांड्यातल्या झोपाळ्यार बसलेले. सुधा त्यांच्या आयुष्यात आल्यापासूनचा काळ त्यांच्या डोळ्यासमोरुन एखाद्या चलतचित्रासारखा जात होता.


हाजिकासम चाळीतलं एका रुमचं घर. त्यात सुधाने टुकीने संसार केला. शामरावांच लग्न झालं तेंव्हा पाठच्या दोन बहिणी लग्नाच्या होत्या. शामरावांच्या आईला संधिवात होता. तिच्याच्याने काही काम होत नसायचं तरी सुधाने कधी सासूची तक्रार केली नाही.


सुधा नणंदांना हाताशी धरुन घर सांभाळू लागली.  सुधाच्या हाताला विलक्षण चव. आजुबाजूच्यांना शेजारपाळं द्यायची.  त्यांनीच सुचवलं, पोळीभाजीचे डबे करा म्हणून आणि पोळीभाजीचं काम सुरु झालं.  शामराव दर दोन दिवसांनी  मार्केटमध्ये जाऊन भाज्या घेऊन यायचे. सगळी मिळून रात्री भाज्या स्वच्छ करुन ठेवत व पहाटे उठून सुधा भाज्या फोडणीला घाले. घडीच्या पोळ्या करे. एकदम लुसलुशीत. 


 गिऱ्हाईकांची संख्या वाढू लागली तसं सुधाने वाडीतल्या दोन बायांना हाताशी घेतलं.  उपवासाच्या दिवशी साबुदाण्याची खिचडी करे.  घराला चांगले दिवस आले होते. थोरली शमिका डबा घ्यायला येणाऱ्या पुरुषोत्तमाच्या प्रेमात पडली.  त्याच्यासोबत हिंडायफिरायला लागली.  चाळभर बातमी पसरायला वेळ लागला नाही.  सुधेच्या कानावर बातमी जाताच सुधेने तिची चांगलीच कानउघाडणी केली. हरतर्हेने समजावलं पण प्रेम आंधळं असतं म्हणतात ना तसंच झालं . 


एके दिवशी सुधेच्या हातावर तुरी देऊन शमिका पळून गेली.  संध्याकाळी तिचा सुधेला फोन आला वहिनी मी लग्न केलंय म्हणून. शामरावांच्या आईने डोक्याला हात लावला पण सुधाने त्यांना धीर दिला. 


शमिका दोनच महिने सासरी राहिली नंतर माहेरी निघून आली कारण शमिकेचं सासूशी पटेना व तिला वेगळं रहायचं होतं पण शमिकाच्या नवऱ्याने ठाम नकार दिला.  धाकटीचंही लग्न लावून दिलं. धाकटी तशी समजुतदार होती. ती तिच्या संसारात रुळली.


दोन वर्षांनी शामरावांच्या घरी पाळणा हलला. त्यांच्या सुखी संसारात बाळराजाचं आगमन  झालं. शमिकाचा नवरा शमिकाला घरी येण्यासाठी आग्रह करीत होता.  शेवटी एकदाचं गंगेत घोड न्हालं.  सुधाने मुद्दाम शमिकेशी भांडण काढलं आणि मग शमिकाने तिच्या नवऱ्याला फोन लावला.  संध्याकाळी शमिकाचा नवरा तिला घेऊन गेला पण जाताना नजरेनेच सुधेचे धन्यवाद मानायला विसरला नाही. 


 शामराव व सुधाचा वरुणही काही वर्षांत शाळेत जाऊ लागला. सुधा सासुकडे नीट लक्ष देत होती. फावल्या वेळात तिच्याची चार गप्पा मारी.  नणंदांचाही पाहुणचार करी.


  एवढ्याशा खोलीत पोळीभाजीचा व्याप आवरेना म्हणून तिने बाजूची रिकामी खोली भाड्याने घेतली होती. चार बायांनाही तिच्यामुळे रोजगार मिळत होता. काही वर्षांत शामरावांची आई देवाघरी गेली पण जाताना सुधेला पोटभर आशिर्वाद देऊन गेली.  वरुण अभ्यासू होता. भरपूर शिकला. प्रोफेसर झाला. 


शामराव सेवानिवृत्त झाले तसं काही वर्षांत चाळीतलं घर सोडून शामरावांनी गावी बस्तान बसवलं. छान माडीचं घर बांधलं. वरुणचं लग्न करुन दिलं, त्याच्या आवडत्या मुलीशी. वैदेही व वरुण दोघेही कॉलेजात प्रोफेसर होते पुण्याला. ते तिकडे रहायला गेले. 


घरात फक्त शामराव व सुधा रहायचे. सुधा शामरावांना सारखं सारखं समजावयची जरा स्वैंपाक शिकून घ्या म्हणून. शामराव हसण्यावारी न्यायचे. तू आहेस नं एवढी सुगरण मग मला शिकायची काय गरज म्हणायचे. त्या रात्री सुधाने छान मसालेभात केला होता. जोडीला फोडणीचं ताक. दोघंही जेवली व अशीच निवांत झोपाळ्यावर बसली होती.


 सुधाच्या काय मनात आलं ते शामरावांना म्हणाली आलेच हं आणि घरात जाऊन कपाटातली नववारी साडी काढली. शामरावांनी फार पुर्वी तिला घेतलेली हळदी रंगाची हिरव्या काठाची.  सुधा ती साडी नेसली. अजुनही केस छान होते तिचे. छान सैलसर वेणी घातली. संध्याकाळी शामरावांनी चाफ्याची फुलं काढून आणली होती. ती पिनात घालून माळली. पावडर लावून लालबुंद कुंकू कपाळी लावलं. मोठं मंगळसूत्र घातलंन व शामरावांच्या बाजूला झोपाळ्यावर येऊन बसली.


 शामराव बघतच राहिले तिच्याकडे.  साठी जवळ आली तरी नव्या नवरीसारखी लज्जा तिच्या चेहऱ्यावर दिसत होती व चेहऱ्यावरचं तेजही अजून कमी झालं नव्हतं. तिचा हात हातात घेऊन ते बराच वेळ भुतकाळातल्या आठवणीत रमून गेले. तिथेच त्यांचा डोळा लागला.


 कधीतरी रात्री जाग आली तेंव्हा त्यांनी पाहिलं सुधाने त्यांच्या मानेवर डोकं टेकवलं होतं. सुधाचं अंग थंडगार झालेलं. सुधाने तिची जीवनयात्रा संपवली होती. 


शामराव अक्षरशः लहान मुलासारखे ओक्साबोक्शी रडू लागले. आजुबाजूचे जमा झाले.वरुण वैदेहीला कळवण्यात आलं. मग बारा दिवस सगळे नातेवाईक, ओळखीपाळखीचे येऊन भेटून जात होते. वरुण शामरावांना पुण्याला यायचा आग्रह करीत होता पण शामराव नाही म्हणाले. 


शेवटी शमिकाने ओळखीचा एक स्वैंपाकी शामभाऊंच्या जेवणाच्या सोयीसाठी नेमला. धुण्याभांड्याला बाई लावली. दोघी नणंदाही वहिनीच्या आठवणीने खूप रडल्या. तिने त्यांच तेवढं केलं होतं.  शेवटी त्याही सासरी निघून गेल्या.  


शामरावांना रामूने जेवण वाढलं . रामू जेवण छान बनवायचा पण शामरावांनी पहिला घास घेतला नी तो त्यांच्या तोंडातच राहिला. सुधाच्या फोटोकडे पहात त्यानी जोरात हंबरडा फोडला . सुधा मला तुझ्याच हातचं जेवण हवं गं म्हणत ओक्साबोक्शी रडू लागले.  रामूच्याही डोळ्यात पाणी आलं.  तिथेच शामरावांनी मान टाकली.  गेले ते त्यांच्या सुधाच्या पाठोपाठ, तिला भेटायला.


-------सौ.गीता गजानन गरुड.

मायेचे नातेसंबंध


 #मायेचे_नातेसंबंध 


दामले काका रिटायर्ड झाले. पुर्वी पगार कमी असल्याने व भावंडांसाठीही पैसे खर्च करावे लागत असल्याने त्यांनी त्यांच कुटुंब एका मुलावरच सिमित ठेवलं होतं. दामले काकांना तीन भाऊ व एक बहीण होती. वडील नोकरीला नसल्याने त्यांना मेट्रीक पास झाल्याबरोबर नोकरीसाठी अर्ज करावे लागले होते. शिकण्याची इच्छा फार होती पण घरच्या गरीबीमुळे त्यांना नोकरी करण्यावाचून पर्याय नव्हता. नोकरीच्या ठिकाणी जाऊन ते राहू लागले. जवळच असलेल्या कॉलेजात त्यांनी आर्ट्स शाखेत प्रवेश मिळवला. सकाळी कॉलेज व साडेदहा नंतर नोकरी..घरी आल्यावर समवयस्कांशी मैदानी खेळ,गप्पा असा त्यांचा वेळ जायचा


 शनिवार,रविवारी ते गावी आईला भेटायला जायचे. त्यांना घरी सर्व दादा म्हणायचे. दादा येताहेतसे दिसल्याबरोबर सगळी भावंड पुस्तकं डोळ्यासमोर घेऊन बसायची. दादांचं हातपाय धुवून झालं की ते प्रत्येक भावंडाच्या अभ्यासाची चौकशी करत. सगळी मुलं त्यांना घाबरायची. नोकरीला लागल्यापासून दादांनी घरात सुधारणा करायला सुरुवात केली. माजघर मोठं केलं. घरात जास्त भांडी नव्हती. तांब्या पितळेचे हंडे,कळश्या,डझनावर ताटं,तांब्ये,ग्लासं,मांडली घेतली. माजघराचं रुप पालटलं. स्वतः साठीही एक खोली बनविली.


मोठ्या भावालाही नोकरी लागली होती पण तो सगळी कमाई आपल्या कुटुंबावरच खर्च करे. घरी काय द्यायचे झाले की तो व त्याची पत्नी दोघंही नन्नाचा पाढा लावत. सगळ्या भावंडांची शिक्षणं करेपर्यंत दादांच लग्नाचं वय सरुन जात होतं पण मोठ्या भावाला त्याची मुळीच पर्वा नव्हती. त्याचं फक्त तो,त्याची पत्नी व मुलं एवढंच विश्व होतं. 


पुढे दादांचही लग्न झालं. ते मग पत्नीसोबत नोकरीच्या गावी रहावयास गेले. तरी घरचे खर्च एकामागाहून एक त्यांच्या पाठीवर होतेच. प्रत्येक भावंडाच्या लग्नाचा खर्च,काही सणसमारंभ असेल तर तो खर्च.. साहजिकच दादांच्या पत्नीला वसूला काही शिल्लक ठेवता येत नव्हती. दादांना जरी वाटले नाही तरी त्यांच्या पत्नीला, वसूला वाटे की आपणच कशाला पोटाला चिमटे काढून,हौसमौज मारुन संसार करायचा. मोठ्या दिरांनी,जावेनेही गावच्या घरी लक्ष घालावे. त्यांचीही आईवडीलांप्रती काहीतरी जबाबदारी आहे व त्यांनी ती पार पाडली पाहिजे. यावरुन दादांत व वसूत फार खटके उडत. 


वसूलाही वाटायचंकी सणासुदीला नव्या साडीची घडी मोडावी. त्यावर मेचिंग दागिने घालावे. वेणीत गजरा माळावा,छान छान चपला घ्याव्या,झोपायला पलंग,मऊशार गादी घ्यावी पण तिला ते शक्य नव्हतं.


 दिरांची लग्न, त्यानंतर ते नोकरीला लागेपर्यंत त्यांचे संसार उभारुन देईपर्यंत वसूचा संसार मागेच राहिला. वसूला देण्याघेण्याची आवड होती. पण तारुण्यसुलभ अवखळपणा तिच्यातही होता. तिलाही वाटे कधीतरी चार दिवस फिरायला जावं,समुद्राकाठी जावं,मऊशार वाळूत फिरावं,कधीतरी स्वैंपाकाला सुट्टी देऊन बाहेर जेवायला जावं पण कर्जाचे हफ्ते फेडल्यानंतर उरलेल्या पैशात तिची ही स्वप्नं केवळ स्वप्नच रहात होती.


 हळूहळू मग तिनेही आहे ती परिस्थिती स्विकारली. मुलाच्या, वेदच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित केलं. दिर छान नोकरीला लागले. प्रत्येकाला मुलं झाली. प्रत्येकाने आपलं घर घेतलं. दादाही आत्ता सेवानिवृत्त झाले. वेद   प्रोफेसर झाला. सगळं आत्ता कुठे हळूहळू मार्गी लागत होतं.


अचानक वसूची तब्येत ढासळू लागली. तिचं वजन दिवसेंदिवस कमी होऊ लागलं,वारंवार सर्दीताप येऊ लागला,हिरड्यांतून,नाकातून रक्त येऊ लागलं. रात्री झोपेत अंगाला घाम येऊ लागला. वसूला ही लक्षणे काही ठीक दिसेशात.कधी नव्हे ते वसू डॉक्टरांकडे गेली. सगळ्या टेस्ट करण्यात आल्या. वसूला रक्ताचा कर्करोग झाला होता.


 दादांच्या पायाखालची जमीनच सरकली. इतके दिवस त्यांनी त्यांच्या वसूला ग्रुहितच धरलं होतं. सर्दीपडसंही जिच्या वाऱ्याला येत नसे त्या वसूला एवढा दुर्धर रोग होणं कसं शक्य होतं पण नियतीने तिचं गणित मांडल होतं. दादांकडे शिल्लकही कमीच होती. कधी नव्हे तो त्यांनी भावांपुढे हात पसरला पण ज्या भावांसाठी त्यानी फार उशिरा लग्न केलं, त्यांचं शिक्षण,लग्न यांसाठी कर्ज काढून आयुष्यभर त्या कर्जाचे हफ्ते भरत राहिले त्या भावांनी हात वर केले.' छे छे, आमच्याकडे कुठून आले पैसे!' असं म्हणत दादांना दरवाजाची वाट दाखवली.


 वसूला दादा केमोथेरपीसाठी घेऊन जायचे. टाटा हॉस्पिटलमधल्या डॉ. निशांतने वसूला ओळखलं. वसूचा मुलगा वेद हा तिसरीत असताना त्याच्या जोडीला निशांत नावाचा मुलगा होता. निशांतची आईही  कर्करोगाने देवाघरी गेली होती. वेदने जेंव्हा वसूला निशांतबद्दल सांगितले तेंव्हा वसू वेदसोबत निशांतलाही डब्बा पाठवायची. परीक्षेच्या वेळी वेदसोबत निशांतचाही अभ्यास घ्यायची. पुढे निशांत आठवीत असताना त्याच्या वडलांची बदली झाली. तेंव्हा निशांत वसूच्या पदरात डोकं खुपसून हमसून हमसून रडला होता. निशांतचे वडील त्याला बाहेरगावी घेऊन गेले,तोच डॉ.निशांत. 


 वसूला त्या अवस्थेत पहाताच डॉ. निशांतने वॉशरुममध्ये जाऊन भरपूर रडून घेतलं. डॉ.निशांतने मग दादांना धीर दिला व वसूआईची सारी जबाबदारी तो घेणार असं सांगितलं. जवळजवळ वर्षभर कर्करोगाशी झुंज देऊन वसू नवीन आयुष्यात परत आली. हे सारं निशांतमुळे शक्य झालं. दादांना पटलं की आपण केलेलं वाया जात नाही कोणत्या न कोणत्या रुपात देव आपल्या पाठीशी उभा रहातोच. पण त्यांच्या भावांनी कठीण प्रसंगी त्यांच्याकडे पाठ फिरवल्यामुळे ते हेही शिकले की यापुढे कोणालाही मदत करताना हातचं राखूनच मदत करायची. आपल्याला झेपेल तेवढीच करायची.


डॉ.निशांतच्या लग्नात दामले काकाकाकूंना व वेदला स्पेशल आमंत्रण होतं. रक्ताच्या नात्यांपेक्षा हे मायेचे नातेसंबंध अधिक दणकट होते.


-----सौ.गीता गजानन गरुड.



बुधवार, २५ नोव्हेंबर, २०२०

आज्यांची शिकवन(मालवणी गोष्ट)

 #आज्यांची_शिकवन


रामगो चवथे इयत्तेत हुतो.तेच्या पाठीर दोन भयनी हुत्या.रामगो,तेचे भयनी,आऊस,बापूस नी आजे अशी स जना तेंचे घरात हुती.रामग्याच्या बापाशीचा बारीकसा दुकान हुता. तेतूर नारळ,कांदं,बटाटी,चाकलेटा,गुळये,..असा बराच कायनूमायनू इकूक ठेयलेला असायचा.



गुदस्ता रामग्याचो शेरात रवनारो चुलतो तेचे झिलाक नी बायलेक घिऊन इललो,मुलुक देखवूक.  आर्य नाव हुता त्या मुलाचा. आर्य तिसरीत हुतो पन काय फाडफाड इंग्रजी बोला!  आवशीक ममी नी बापाशीक पप्पा. तेका खरातर मातीत खेळूची लय हौस पन तेची ममी तेका मातयेत हात घालूक देईत नाय हुती. भुतूर जर्मस आसतत सांगी. 


 एके दिशी आर्यचे ममीक तेची आऊस लय शीक असा म्हनान फोन इलो. तेबरुबर आर्यचो बापूस आर्यचे ममीक घिऊन रत्नागिरीक सासयेकडे जाऊक  गेलो.  आर्यक तडे कोन बघतलो म्हनान तेका हडेच मुलकात ठेयल्यानी.


रामगो तेका आपले शाळेत घिऊन गेलो.आर्यचे शाळेत जाऊक शाळेची बस हुती.  हयसर काय बसबीस नव्हती. रामगो नी तेचे मित्रांवांगडा शेतातल्या म्हेरेंवरसून आर्य चलाक लागलो. लोका भाता कापीत हुती. वझी बांधीत हुती.  घराकडे व्हरत  हुती.  रामग्यान तेका भात कसो पेरतत, नांगरनी कशी करतत ,तरवो कसो लावतत सगळा येवस्थित सांगला. शाळेतल्या मास्तरांनी आर्यक रामग्यावांगडा बसूची परवानगी दिल्यानी.  तेना सगळ्या इद्यार्थ्यांका पोएम म्हनान देखवल्यान. 


 रामगो शाळा सुटल्यार आर्यक घिऊन नह्यवर गेलो.थय तेका तेना वायच वायच पेवूक शिकवला. कुर्ले पकडल्यानी.  ईसेक गावले. घरी हाडून आयेक दिल्यानी. मस्तपैकी कुर्लीचा सांबारा नी उकड्या तांदळाचो भात ,सगळी पोटभर जेयली.  आर्यक ह्या जेवान लयच आवाडला.


 आर्य रामग्यावांगडा पेज जेवायचो. भाजीभाकरी खायचो.  भात गिरनीतसून हाडीतागत किती कष्ट करुचे लागतत ता आर्यन बघितलेकारनान तेना अन्नाचो कवाच इद्वास करुचो नाय असा आपले मनानच निश्चय केलो.


 निमार कमी झाला काय सगळी पोरा मिळून फाळयेत बेट बॉल खेळीत. तिनसाना देवाच्या पाया पडून अभ्यासाक बसीत.  मगे रातीचा जेवान.जा असात ता.हडे आर्यचे कसलेच मिजासी नव्हते.  राती तेंका आजी भुताचे गोष्टी सांगी. साताठ दिसात आर्य पेवाक शिकलो. तिखट खाऊक शिकलो.  मम्मीशिवाय रवाक शिकलो. तेची मम्मी इली तशी मगे तेका घिऊन गेली.  जाताना आर्यन भारी शर्ट नी पेंट घातलली.


रामग्याक तसली शर्टपेंट व्हयी झाली. रामग्यान आवशीक राती सांगल्यान,"आये माका येकतरी आर्यसारी भारीतली शर्टपेंट व्हयी."


आर्यचे आवशीकव लय वाटा आपले झिलानव भारीतले कपडे घालूचे. पन तेंचे  दुकानार जास्ती गिरायका येत नसलेकारनान नफोच हुईत नव्हतो. नफो कसलो.उधारीच वाढलेली.यंदा लोकांचा पीक पावसाकारनान व्हावान गेलला. वायच काय गावला ता गिरनीर न्हेला तर तेचे तांदूळव धड गावाक नाय.सगळी कणी.  तेकारनान तेका कोन इकत घेईना. सगळीच फाटकी झालली. बरा झिलमानसा दुसरा काय बघतीत तर तेंका राजकारनापुढी टाईमच नव्हतो.


रामग्याची आऊस नी रामगो ऐतवारी बाजारात गेली. कपड्याचे दुकानात भारी भारी शर्टा दुकानदारान तेंका देखवली. पन किमत लयच म्हाग.  रामग्याची आऊस म्हनली,"बाबू इतकं पैकं नायत रं आपल्याकडं. आपून साध्याशा दुकानात बघाया चल.  ते दुकानदाराक हे दोघांची दया इली. तेना भुतूरसून येक शर्टपेंट हाडली नी रामग्याचे आवसीक बोललो. हिका पाठलेबाजूक येक बारकोसो होल असा. तुमी घेतलास झाल्या रफू करून दितय.  फकस्त दोनशे रुपयात घेऊन जावा." 


रामग्यान परत आवशीकडे काकुळतीन बघल्यान.  आवशीन कनवटीची दोनशेची मोड काढली नी दुकानदाराक दिली. दुकानदारानव त्यो होल बाजूचे रफुवाल्याकडसून लगेच रफू करुन दिलो. रामगो लयच खूष झालो. 


 शाळेत नईन कपडे घालून बोलवलेल्यानी तवा रामगो ह्यो डिरेस घालून ऐटीत गेलो. सगळी पोरापोरी तेचे डिरेसकडं बघान कौतुक करुक लागली. रामग्याक लय बरा वाटत हूता.  तितक्यात परबांच्या नितिनान रामग्याचे पाठलेबाजूचो रफू बघल्यान नी मोठमोठ्यान हसाक लागलो. त्येचा हसना ऐकान बाकीचीव पोरा रामग्यार फिदीफिदी हसाक लागली. 


रामग्याक लय वाईट वाटला पन तेका तेच्या आज्यांचे शबुद आठवले. तेचे आजे तेका नी तेचे भयनींका रोज चार  गोष्टी सांगीत. ते म्हनीत,"पोरांनो कवाच कोनाक तेचे गरिबीवरसून किंवा कुठचेच कारनारसून चिडवायचा नसता.  कोनाच्याव डोळ्यात आपल्याकारनान दुखा येता काया नये.  तुमका कवा कोनी चिडवलाच तर तेका मारुक धावू नका. तुमी चिडलात तर चिडवनाऱ्यांका, तुमच्यार हसनाऱ्यांका आजून जोर येतलो. तवा तडेसून गप बाजूक होवा. चिडवनारे,हसनारे आपसी बंद होतले.जास्तीच तरास देवूक लागले तर गुरुजींका नायतर आवशीबापाशीक तेंचा नाव सांगा."


रामग्या येकदम चिप रवलो. हसनाऱ्या पोरांका खाल्ल्यासारा झाला. तेंनीच मगे येऊन तेची माफी मागल्यानी. रामगोव मगे खुदकन हसलो नी सगळी पोरा परत खेळाक सुटली.


------सौ.गीता गजानन गरुड.

मी संकेत


 मी संकेत


मी संकेत सावंत, सध्या सत्तावीस सुरु आहे. घरात पाय टाकताच आई लग्नाचा विषय काढायची. लग्नासाठी मुलगी शोधत होतो पण मिळत नव्हती. बीए बीएड आहे मी. एका प्रायव्हेट शाळेत शिक्षक आहे. 


तीनचार स्थळं बघून झाली.  मुली थेट नकार कळवायच्या. त्यांना सरकारी नोकरी हवी असते. एमपीएससी तीनदा दिली पण नाही जमलं मला ते. आपलं लकच खराब. गेल्याच महिन्यात एक स्थळ पहायला गेलो होतो. मुलगी नाकीडोळे छान होती. कांदेपोहेही झक्कास होते. मुलीच्या वडलांच्या जास्त अपेक्षा नव्हत्या. तिथेच ठराव वगैरे केला. रात्री मला त्या मुलीचा फोन आला. माटुंग्याच्या ब्रीजवर भेट म्हणाली. मी जाम खूष. रात्री स्वप्नात तिला कुशीत घेऊन झोपलो. तिच्या नाजूक बोटांशी चाळा केला. तिच्या सुंदर ओठांवर बोटं फिरवली.  अजून पुढचं स्वप्न साकारायच्या आधीच आईचा आवाज,"बंड्या,संडासाजवळ लाईन नाय हाय. मी जाऊन आले. तिनपाट घेऊन नंबर लाव जा तुझा." आयला,चरफडतच उठलो. मनात म्हंटल,'ही आई सध्या असं बोलतेय. उद्या लग्न झाल्यावर माझ्मा बायकोसमोर असं बोलली तर काय ईज्जत राहील माझी.


 आधी आईला ट्रेनिंग द्यायला हवं असं ठरवून मी तिनपाट भरुन घेतलं नी आमच्या चाळीच्या सार्वजनिक विमानतळाकडे आगेकूच केलं. तेवढ्यात तावडे आजोबा आले व मला म्हणाले,"बंड्या,माझ्याच्याने थोपवत नाही रे लेका. जाऊ का मी आधी?" मी मानेनेच हो म्हणालो. तरी.. "स्पष्ट तोंडाने काय ते सांग. असं नाराजीने हो म्हंटलस तर मला साफ होणार नाही. नजर लागते हो." मी काकांना दंडवत घातला व जा म्हणालो. एका तासात मला माटुंग्याला पोहोचायचं होतं. तिच्याशी काय बोलणार याचा विचार करत असतानाच आगलावे काकू आल्या व बोलू लागल्या,"काय रे संकेत, काल सगळीजणं मिळून मुलगी बघायला गेलेलात वाटत़ं. आवडली का तुला? मला फोटो दाखव हो. लग्नाची तारीख कधीची धरताय? हॉल कोणता बुक करणार अहात? अरे तो बर्वेंचा हॉल बरा नाही. वाढपी मेले चमचे आपटत जातात. धड वाढतच नाहीत. जिलबीचं ताट एकदाच येतं नंतर परत दिसतच नाही नी अळूच्या फदफद्यालाही चव नसते हो. भजी तर नुसती गारढोण. त्यापेक्षा तू त्या गांधी चौकातल्या चितळ्यांचा हॉल बुक कर. भाडं थोडं जास्त आहे. पण मसालेभात काय टेस्टी असतो सांगू तिथला. काजूही भरपूर घालतात. वरती अश्शी तुपाची धार सोडतात. भजी तर एवढी चविष्ट असतात म्हणून सांगू आणि हो आठवलं,श्रीखंड ते स्वतः बनवतात. एकदा खाशील तर बोटं चाटतच रहाशील अशी चव हो. श्रीखंडपुरीचा घास भरवायलाही कसं बरं वाटतं नाही." मी म्हंटलं,"नाही ओ काकू मला अनुभव या गोष्टींचा." 

"हात मेल्या, तुला रे कसा असणार अनुभव. पीजे मारु नकोस.(इतक्यात तावडे आजोबा बाहेर आले व दार मोकळं पाहून पांडेजी आत घुसले.) बरं उखाण्याचं काय केलसं? गुगलवर शोध. दहाबारातरी पाठ हवेत. तो जुनापुराणा मेथीचा घेऊ नक्कोस. आणि त्या तांबेंच्या विशालसारखा खुळचट उखाणा नको हो घेऊस. काय तर म्हणे कपावर कप त्यावर ठेवली बशी माझी हेमा सोडून बाकी साऱ्या म्हशी. मेल्याच्या जीभेला काही हाड. चल येते हो.' कसातरी काकूंच्या तावडीतून सुटलो. पोट मोकळं करुन आलो. आंघोळ केली. मस्त गुलाबी रंगाचा टिशर्ट घातला. जीन्स घातली. बहिणीच्या डब्यातली फेअर अँड लवली थापली. पावडरबिवडर लावली. सेंट फवारला नी तिला भेटायला निघालो. रविवार असल्याने सुट्टी होती. आई म्हणाली,"येताना मिरची,कोथिंबीर नी लिंबू आण रे बंड्या." मी मान डोलावली.


ब्रीजवर गेलो. ती माझ्या आधीच आली होती. माझं ह्रदय जोरात धडधडायला लगलं. कसाबसा मी तिला चल चहा घेऊ म्हंटलं. आम्ही खाली उतरलो. जरा पॉश हॉटेलात गेलो. मी तिला काही घेणार का विचारलं. ती गप्पच होती. शेवटी मी दोन कोल्ड्रिंक्स मागवले. कोल्ड्रिंक पितापिता मी हळूच तिच्याकडे पहात होतो. जांभळा ड्रेस खुलून दिसत होता तिला. काय बरं उखाणा घ्यावा हिच्यावर असा विचार मनात चालू झाला इतक्यात तीच म्हणाली ,"तुम्ही मला चुकीचं समजू नका पण मी तुमच्याशी लग्न करु शकत नाही. आईबाबांसाठी मी ठरावाचं नाटक केलं. खरं तर माझं आधीच दुसऱ्याबरोबर प्रेम आहे. दोन वर्षापासून आमचं फीक्स आहे तेंव्हा दादा तुम्ही प्लीज मला नकार द्या." माझ्या तर पोटात गोळाच आला. आत्ता आईला काय सांगणार फार मोठं प्रश्नचिन्ह. 


तिचा निरोप घेऊन व माझं भग्नावस्थेतलं काळीज घेऊन तिथून निसटलो. लालबागला मित्राच्या खोलीवर गेलो. हा सच्या माझा लंगोटीयारच म्हणा. अगदी केजीपासून एकाच शाळेत,एकाच वर्गात. आम्ही दोचं जणू एकमेकांचा आरसाच. त्याने मला काहीच विचारलं नाही. गरमगरम कॉफीचा पेला माझ्यासमोर ठेवला. त्याची बायको मुलाला शिकवत होती. एका रुमचं घर पण कसं स्वच्छ ,टापटीप लावलेलं. भांड्यांची मांडणी अगदी आखीवरेखीव अशी. वरती मोठे डबे रांगेत लावलेले. त्याखाली छोटे डबे. त्याखाली नेहमीचे वापरातले टोप वगैरे.


समोरच्या गेलरीत एक तरुणी कपडे वाळत घालत होती. मी तिच्याकडे पहातच राहिलो. सच्या बोलला ,"अरे ते समोरचे पेडणेकर खोली विकून बदलापूरला गेले. हिच्या मामाने ती रुम घेतली.दोन मुलं आहेत त्याला. मुलगी नुकतीच बीए झालेय,श्रावणी नाव तिचं. ती समोर दिसतेय तीच. मुलगा विकी शाळेत जातो. हिच्यासाठी स्थळं शोधणं सुरु आहे पण मुलांना नोकरीवालीच मुलगी पाहिजे. मी म्हंटल,"सच्या माझ्यासाठी विचारशील?"

सच्या हसला,हो म्हणाला. मग तर आपण साडूसाडू होऊ म्हणाला. तिच्या घरी गेलो. वडलांना भेटलो. तिच्या आईवडिलांना मी पसंद पडलो. तीही लाजली म्हणजे तिनेही होकार दिला. मला खूपच आनंद झाला. जिलेबी घेऊन घरी आलो. आईला सगळं सविस्तर सांगितलं. तिनेही होकार दिला. महिन्याभरात मी बोहल्यावर चढलो. मित्रांनी हळद अक्षरश: गाजवली. गडुळाचं पानी,आलिंगनाला..कुठचं गाणं सोडलं नाही. चाळीत हीच तर खरी गंमत असते. एकाचं लग्न ठरलं की ते होईपर्यंत सगळे चाळकरी वराडी होतात. अगदी तांदूळ निवडणे,पापड लाटणे.. सगळी कामं एकत्र येऊन घरचं कार्य असल्यासारखी करतात. 


लग्नाआधीचे पंधरा दिवस आम्ही घरात जेवलोच नाही. केळवणासाठी सगळ्या चाळकऱ्यांकडून आमंत्रणं होती. प्रत्येकीने अगदी मनापासून खाऊ घातलं. सुमा काकूंच्या हातच्या पुरणपोळ्या एकदम बेस्ट. दहिवले काकूंच्या हातचं वरण तर मी लहानपणापासून खात आलोय. आमच्याकडे नेहमी तिखट आमटी म्हणून मग मी दहिवले काकूंकडून रोज  वरण घेऊन यायचो. केळवणाला त्यांनी माझ्यासाठी खासं वरणफळं केली होती. राणेकाकूंनी वडेसागोतीचा बेत केला होता. 


पुऱ्या चाळीला लायटींग केलं होतं. आमचं मंडळ भारीच. मंडळ मी तुमचा आभारी आहे असं म्हणणार नाहीच. ही पोरं नी मी वेगळा कुठेय. गणेशोत्सव, दिवाळी,शिमगा सगळं जोशात साजरं करतो आपण. मंडळाने लग्नात गीफ्ट म्हणून मऊ गादी दिलेय. आगलावे काकूंनी रजई दिली वरती भर हॉलमध्ये सगळ्यांना ऐकू जाईल असं म्हणाल्या की वर्षभरात रजईचं काम फत्ते झालं पाहिजे. आम्हा दोघांना कुठे तोंड लपवू नी कुठे नको असं करून सोडलन.


श्रावणी दुधात साखर मिसळतात तशी आमच्या कुटुंबात मिसळली. आईसोबत घरातली,बाहेरची सगळी कामं शिकली. रात्री माळ्यावरच माझ्या वाटेला येते.  भरभरून सुख देते मला. एखाद्या अल्लड मुलीसारखी माझ्या कुशीत शिरते. सकाळपासूनचा सगळा व्रुत्तांत सांगते मला. सकाळ होताच जवाबदार सुनेच्या भुमिकेत शिरते. नळाला तोटी लावून सगळी भांडी भरुन घेते. चहाचं आधण ठेवते. शुचिर्भूत होऊन देवपूजा करते. आईला सध्या संधिवाताने जखडलय. तिला समजून घेते. खरंच श्रावणीने माझ्या आयुष्यात श्रावण आणलाय. आगलावे काकू येतात कधीकधी विचारायला,"काय मग श्रावणी पेढे कधी?" त्यांच्याशीही गोड बोलता येतं श्रावूला. पोळीभाजीचे डबे करायचे म्हणतेय. मी तर  हो म्हणालो तिला. तिला लागेल तेवढी सर्व मदत करणार मी. मार्केटिंगचं काम मी घेतलय. तुमचे आशिर्वाद व शुभेच्छा असोत आमच्या पाठीशी.🙏


-------गीता गजानन गरुड.

# गीता गजानन

कोकणातील पारंपरिक गोड पदार्थ

घावणे

घावणे करुच्यासाठी सुरय तांदूळ टोपात घेऊन पानयान स्वच्छ धुऊन रोवळीत  पाघळत ठेवतत . तांदूळ साफ पाघळले की  सावलीत येक धोतराचो फडको हाथरतत नी तेच्यार हे तांदूळ सुकत घालतत. तांदूळ जर आंबेमोहोराचे आसले तर घावण्यांका छान वास येता. वालयचे, पांढर्या बेळ्याचे किंवा पाटणीच्या तांदळाचे सुद्धा घावणे छान होतत.
तांदूळ सुकल्यार येखारदो पंचो हाथरून तेच्यार जाता मांडतत.नी  जात्यातून बारीक पीठ येईल असे तांदूळ दळतत.मगे टोपात व्हया तितका पीठ घेतत तेतूर पानी ओततत नी पीठ दूधासारा पातळ करतत.चवी पुरता मीठ घालतत.
भिड्याक तेल लाऊच्यासाठी येक फूट लांबीचो केळीच्या पानाचो मागचो दांडो कापून घेतत.तेची पुढची बाजू कोयत्यानं झेजरतत कारन वाटयेतला तेल भिड्याक लाऊक सोप्प्या जाता.
चुलीर भिडा तापत ठेवतत. भिडा तापला की  केळीच्या दांड्यान भिड्याक तेल लावतत.तेल लावताना चुरचुर आवाज इलो मग भिडा तापला असा समजायचा. मग टोपातला पानी  पेल्यान यवस्थित ढवळतत नी भिड्यार येकाच येळी गोलाकार ओततत.नी तेच्यार येक मिनीट झाकान ठेवतत.मग झाकान काढतत. घावणो भिड्याचे कडेसून निकाळलो की काइलत्यान अलगद उचलतत नी सुपात ठेवतत.  ताटार ठेवल्यार घावणे ताटाक डसतत म्हनान सुपात ठेवतत.सुकल्यानंतर तेंची घडी करतत नी ताटात  किंवा सुपात रचवून ठेवतत. हल्ली लोका सुकवलेले तांदूळ घरघंटीर दळान हाडतत.
दुसरी येक पद्धत आसता तीव सांगतय. आपनाक व्हये तितके सुरय तांदूळ धुऊन घेतत नी रातसाडी पानयात भिजत ठेवतत. सकाळी तांदळातला पानी काढून ते वायच पानी घालून मिक्सरला लावतत. परत थोडा पानी घालून मिक्सरला लावतत. ते मिसरन येका टोपात घेऊन तेतूर दुधाइतका पातळ होइतागत वायच वायच पानी ओततत.चवीपुरता मीठ घालून ढवळतत. नी मगे वर दिलल्या पद्धतीपरमानच घावणे करतत. चाय नी घावणे, बटाटीची गोडी भाजी नी घावणे, नारळाचा रस घावणे, घावणे मटण  हे कोकणी लोकांचे आवडते मेनू आसत. आपले लेखासाठी माझे चुलत सासयेन जीका आम्ही अण्णांची काकी म्हनतव तीना घावणे नी चटणी करुन फोटू पाठवलो हा.
घावण्यांत जरासी हळद घालून पिवळे घावणे करतत.ते भारी दिसतत.

तवसाळे

तवसाळे करुचेसाठी तवसा किसनीर किसून घेतत नी तो किस  जे आपन तांदळाच्या पिठाचा दुधासारा मिसरण करतव तेतूर घालतत .वायच हातानं कुवळून येकजीव करतत नी मगे घावण्यांसारखेच पद्धतीने तवसाळे बनयतत नी नारळाच्या चटणीवांगडा  खातत.
 गोड तवसाळे बनवूचेसाठी गुळाचो किस  नी तवस्याचो किस तांदळाच्या पीठाच्या पातळ मिसरणात घालतत नी हातान चांगला येकजीव करतत.

सात कप्याचे घावन

सातकप्याचे घावन जास्त करून गणपतीचे नेवेद्यासाठी करतत. येक ओलो नारळ आडाळ्यार किसून घेतत तेतूर किसलेलो गुळ योग्य परमानात चवीनुसार घालतत. खरातर किती खोबरा हा ता बघून बाईमानसा नजरेनं गुळाचा बरोबर परमान ठरयतत . ते वाटयेंचा शास्त्र रोजच्या स्वैंपाकात बसत नाय.
गुळ नी खोबरा येकत्र करुन चुलीर शिजवतत. गुळ खोबर्यात येकजीव झालो की कायल लगेच खाली उतरायची जास्ती येळ आगीर रवलो तर तेची चिकी होयत म्हनान सांगतय.
या गुळखोबर्याच्या मिसरणात येक बारको चमचाभर तुप नी जरासी येलदोड्याची पुड मिस करायची. येलदोडे नी साखर मिकसरला फिरवून पूड करुक सोप्पी पन तेच्येपरास येलदोड्याचे दाणे काढून वरवंट्यान चेचायचे. ती जाडसर पूड अधिक भारी लागता. हे असले बारीसारीख गोष्टी पदार्थांची चव वाढवतत.
घावण्याक करतो तसाच सेम दुधासारा पातळ मिसरण बनवतत.चवीपुरता मीठ टाकतत. नी भिड्याक तेल लाऊच्यासाठी येक फूट लांबीचो केळीच्या पानाचो दांडो कापून घेतत.तेची पुढची बाजू कोयत्यानं झेजरतत कारन वाटयेतला तेल भिड्याक लाऊक सोप्प्या जाता.
चुलीर भिडा तापत ठेवतत. भिडा तापला की केळीच्या दांड्यान भिड्याक तेल लावतत.
तेल  लावताना चुरचुर आवाज इला की भिडा तापला असा समजायचा. मगे टोपातला पानी  पेल्यान यवस्थित ढवळतत नी भिड्यार येकाच येळी गोलाकार ओततत.नी तेच्यार येक मिनीट झाकान ठेवतत.मग झाकान काढतत. घावन्याच्या अर्ध्या भागात उजया बाजूक
गुळ खोबर्याचा मिसरण पसरवतत. मगे घावन्याची डावो भाग उजया भागार परततत नी काइलत्यान हलका हलका दाबतत.  पेल्यान चायवाला चाय वरखाली करतो तसा  घावन्याचा पानी वरखाली करतत नी रिकाम्या जागेर ओततत.
जरा पीठ शिजला की तेच्यार  भरपूर भाजलेला गुळखोबरा शिवारतत नी घावन्याची उजयी बाजू डाव्या बाजूर उपडी करुन काइलत्यान दाबतत. असा सात येळा करतत म्हनान तेका सात कापेचो घावन म्हनतत.

 माहिती स्त्रोत। माझी नणंद .ती सगळेच गोड पदार्थ लय भारी बनवता. सगळ्यांका कायमाय करून खाऊक घालूक तिका लय आवाडता.

मोदक

आज संकष्टी  आसा. त्यानिमतान मोदक करुया.
मोदक करुचेसाठी सुरय तांदूळ टोपात घेऊन पानयान स्वच्छ धुऊन रोवळीत  पाघळत ठेवतत . तांदूळ साफ पाघळले की  सावलीत येक धोतराचो फडको हाथरतत नी तेच्यार हे तांदूळ सुकत घालतत.
तांदूळ जर आंबेमोहोराचे आसले तर घावण्यांका छान वास येता. वालयचे, पांढर्या बेळ्याचे किंवा पाटणीच्या तांदळाचे सुद्धा मोदक छान होतत. मोदकासाठी नव्या तांदळाचा पीठ लागता . तेका चीकटपना आसता. जुन्या तांदळाच्या पीठान मोदकाक तडे जातत. मोदक वळताना फुटतत नी येकदा फुटाक लागले की मग सगळोच मुड आँफ होता. म्हनान पीठाचो रोल लय म्हणजे लयच महत्वाचा.
माका येकदोनदा वाण्यान जुना मोदकाचा पीठ दिलला. नी मोदक वळूक घेतल्यार लागले फुटाक मगे मी त्या पीठाचे सरळ नेवरे केलय नी मोकळा झालय.
मोदक करुचेसाठी टोपात वाटीभर पानी उकळत ठेवायचा. तेतूर चिमुटभर मीठ टाकायचा नी  वायच तुप टाकायचा.
तुपान मोदकांका चकाकी येता.पानयाक उकळी आली की तेतूर चाळलेला सुवासिक तांदळाचा पीठ अंदाजान घालायचा नी काइलत्यान ढवळायचा. पीठाचे गुठळे होऊक देवचे नाय.मगे तेच्यार झाकान ठेऊन येक वाफ देतत नी टोप चुलीवरना खाली उतरवतत. गरम पीठ वायच गार होऊक लागला की परातीत घेऊन येकसारा मळतत.
 वाटीत तुप घेतत.तुप बोटांका लाऊन न्हान गोळो  घेऊन तेची बोटांनी पारी तयार करतत. तेतूर चमचाभर गुळखोबर्याचा सारण भरतत.नी पारीक दोन बोटांनी कळ्या करतत. त्या कळ्या पाचव बोटांनी  येकठे करतत. नी  मोदक तयार होता.
मोदक बनवून होऊचे आधीच टोपात पानी उकळत ठेवतत. तेच्यार चाळण ठेवतत. धुऊन पुसलली परसवातली हळदीची पाना चाळणीत ठेवतत.मगे चाळणीत सगळे मोदक गोलाकार लावतत. थोडेसे नेवरेपण करतत. मोदकाच्या कळ्या करूक माका न्हानपणी जमत नव्हत्या पन करुची आवड.मग आईन माका चार पाकळेचे मोदक शिकवलेले. ते पण भारी दिसतत.
हळदीच्या पानान मोदकांका मस्त सुवास येता.

शिरवाळे

रसशिरवाळे ह्यो न्हानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचो येकदम आवडीचो पदार्थ हा. हेच्यासाठी घावण्यासाठी आपण जा पीठ तयार करतो तसा पीठ जात्यार दळून तयार करतत.
आपनाक जितके शिरवाळे करुचे हत ते अंदाजान पीठ येका मोठ्या परातीत घेतत. तेतूर वायच मीठाचो खडो टाकतत. येका मोठ्या टोपात भरपूर पानी उकळत ठेयतत. उकळता पानी तांबयान ते पीठात लागात तसा ओततत.
जास्त ओतून ठेवला तर तेची पिठी होयत.म्हनान अंदाज घेऊन ओततत.काईलत्यान पीठ नी पानी ढवळून येकजीव करतत. थंड पान्यात हात बुडवून ता उन उन पीठ  येकदम चांगला मऊसूत मळून घेतत.नंतर ते पीठाचे लांबट मुटकूळे बनवतत नी ते टोपातल्या उकळत्या पानयात सोडतत.हे मुटकुळे सावशीत पानयात सोडूचे लागतत नायतर उकळता पानी अंगार पडूची भिती आसता. टोपार झाकान ठेवतत. पाच मिनटात झाकान काढतत नी मग ते मुटकुळे पानयार तरंगाक लागले की चमच्यान येयेक मुटकुळो काढतत नी लाकडी सोर्यात घालतत. हे कामाक दोन मानसा लागतत.
येकजण शेवग्याचा हँडल हळूहळू खाली करता तसे शिरवाळे सोर्यातून खाली येऊ लागतत दुसरो मानूस ताटात केळीचा पान घेऊन ते ताट पुढेमागे करत तेतूर शिरवाळे काढून घेता. ताटातले शिरवाळे सुपात केळीचा पान घालून तेच्यार काढून ठेवतत.
स्वच्छ धुऊन पुसलेल्या केळीच्या पानांत  शिरवाळे वाढतत तेच्यार रस ओततत नी खाऊक सुरवात करतत.रस शिरवाळे आसले की घरात भात,डाळ,भाजी असा जेवण करुची गरज लागत नाय.घरातली न्हानमोठी सगळीजणा पंगतीत बसान केळीच्या पानार पोटभर रस शिरवाळे खातत.
शिरवाळ्यांचो शेवगो परतेकाचे घरात वडिलोपार्जित असता. तो लाकडी नायतर पितळेचो आसता. कोनायजवळ नसलो तर शेजार्यांकडसून मागून हाडतत नी रसशिरवाळे करतत.

नारळाचो रस

घावणे, शिरवाळे, खापरोळै हे नारळाच्या रसातून खातत. ओलो ताजो नारळ रसासाठी वापरतत.नारळ फोडून तो आडाळ्यार बारीक किसतत. जिरा पानयात भिजत घालतत.
किसलेला ओला खोबरा,भिजत घातलेला जिरा नी येलचीचे दाणे मिक्सरच्या भांड्यात घालतत नी वायच पानी टाकून बारीक करतत. नायतर पाट्यार वाटतत. मगे येका स्टीलचे टोपार पातळ फडको घट धरून तेच्यार ह्या वाटाप ओततत.फडको चारवले टोकांनी धरून तेची गठली करुन नारळाचा दूध शाप पिळून घेतत.
गठलेत जो चोथो रवता तो वायच पानी घालून परत येकदा मिक्सरला लावतत नी पातळ फडक्यान गाळून घेतत.ह्या गाळलेल्या नारळाच्या दूधात गुळ किसून टाकतत , वायच हळद टाकतत. गुळ पुरा इरघळेतागद हाताचे बोटांनी कुवळतत.हळूहळू गुळ नारळाच्या दूधात येकजीव होता. मग ह्यो रस पातळ फडक्यानं पुन्हा येकदा गाळून घेतत.



मालवणी गजाल

 कसालाक गेललस काय रे इसरामा?


निकतो गाडीतसून उतारलय नानांनू. बघितलास, मा आनि इचारताहास काय कपाळ आपला.



शा,बोलाची सोय नाय आजकालच्या पोरांफुडे. बरा काय हाडलस काय रे?


नानांनू,बायलेक इसवन खाइन सारी वाटलीहा.


रे काय सांगतस काय. थोरलो पोरगो धा वरसाचो मा रे. 


नानांनू,तुमचा काय तरीच हां. ओ हे आडगावात मोटे मासे मिळनत नाय तवा कदवा तरी वाटता तेका कायतरी खाइनसारा.


कितक्याक गावली रे? 


ता काय इचारुची सोय नाय नानांनू. मासोकाटो खाना आता आपल्यासारके मानसांचा काम नाय रवला. सातशे सांगीत हुती. भाव करुन पाचशेक घितलय.


अरे,लै म्हाग पडली. तीनशाक मागुक व्हयी होतीस.


होय तीनशाक ठिवलीहा इसवन. चलाक लाग म्हनान सांगतीत त्या गाबतीनी. लै विनसल्ट करतत. 


नानांनू,दोपारी जेवूक येतास आमच्याहारी?


नको रे झीला. मिया आपला असाच इचारलय तुका. तुजे चुलतेन पेडयाचो सार केल्यान हा मस्तपैकी,  पाट्यार वाटाप वाटून.


कित्या ओ लायट नाय हुती?


शीरा घाल ते लायटीर. कवा आसता. नि मिशरव कसो तो बंद पडलो हा. कणकवलेक न्हेऊक व्हयो.


कल जावचा आसा माका कणकवलेक. वायच काम हा. बायलेच्या भैनीचा लगीन ठरलाहा. म्हंजे ता तेंचा तेनीच जमावलाहा खरा पन तरीपन मानपान करुकच व्हयो. सासूक लुगडा,सासऱ्याक सदरो,धोतीर नि म्हेवणीक येक हंडोकळशी घेवची आसा. बाईल मागे लागलीहा कपाट देवया अयेरात. तिची थोरली भैन मिशर देतली म्हनान हेका वडी येतहत. धोरलीचो घो सर्कल हाफिसर आसा नि मिया सादो शिपाय.  हेका समजाक नुको. आता ही पाचशेची इसवन..हेतुर चार दिसाचे मासे इले आसते. कोन हेका समजावतला. मगे आये माजी करवादता. खर्च जपान करा म्हनान सांगता. नितीचाच सांगता ती.


अरे खावंदेत रे. नुको रागेवू तिच्यार. आस्तेआस्ते समाजतला तेकाव. 


काय समाजतला कपाळ. माज्या आयेच्या डोळ्यात फुल पडलाहा. ह्या सांगता सरकारी हास्पितलात आपरेशन करुया. खर्च वाचतलो. माझी आये,माका व्हया तकडे न्हेऊन आपरेशन करुन घिन. हेका काय करूचाहा. आयेसाठी मिया काय कराक गेलय काय हेका खर्च दिसता.


इसरामा,ह्या परतेक नवराबायकोत आसताच रे. आसा सांगत बसू नये जगभर. उद्या तुझी आवस जागेर पडली तर तुझी बाईलच बगतली तिका. तोंडान वायच फटकळ हा पन मायाळू आसा रे छाया.


ताच तर खाऊकपिऊक काय व्हया ता सासयेक करून घालता पन मदीच कवातरी कोयना चाळवता तेचा. बरा नानांनू तुमका म्हायती हा काय आज पुरुष दिन असा,बापयांचो दिस.


अरे कसले दिन घिऊन बसलहस. मागे ममयीत गेललय तवा बगलय. आमचे नातीन ही गुलाबाची फुला गोळा करून हाडलल्यान कालेजातसून,रोज डे म्हनी हुती. मगे काय वडलांचो दिस झालो तवा केक हाडल्यान नि कसला टिशर्ट हाडलल्यान बापाशीसाठी. बापाशीचो मुको घितल्यान. शेरात असता ता सगळा. माजाच सांगतय तुका,न्हान आसल्यापासना शेतीची कामा करत करत शिकलय. शाळेची फी भराक पैसे नाय हुते तेकारनान शाळा सोडूची लागली. मगे काय वरसा मिलमदी हुतय. मिल बंद पडली तवा संपातय हुतय. मगे गावाक इलय. हय चौघांचा घर ना.  घराच्या येका होवरीत बिराड थाटलय. चार पोरा झाली. तेंका वाढवलय. तेंची लग्नाकार्या करान दिलय. जसा नशिबात लिवलाहा तसा वागत गेलय. 


आता घर बांदूचाहा सेपरेट तर पैसे कितके काढू

 हेचेवरसून पोरांचे मिटींगी चललहत. बगान बगान घितलय नि सवता घर बांदूक सुरवात करतलय. 


होय नानांनू,तुमी लय कष्ट उपसलात. आजुनव काम करता. 


अरे जीवात जीव असातागत कामा करतलय. घरादाराक सांभाळतलय. ह्योच खरो पुरुषार्थ रे. बायलेची,आवसीबापाशीची काळजी घेना,पोरांका चांगला शिक्षान देना,भैनीचा मायारपन करना, गावचे इकासात खारीचो वाटो उचलना हे कामांपरीस येगळो नसता रे पुरुषार्थ.


होय नानांनू. बरोबर बोलतात.


-----सौ.गीता गजानन गरुड.

रविवार, २६ मे, २०१९

कोकण मेवा

# गीता गजानन

रतांब्यांची सोला

आमच्या परसवात रतांब्यांची चार वडिलोपार्जित झाडा आसत.ही झाडा माडासारी उंच आसतत. झाडाच्या बुंध्यापासून चार फुटावर फांदये सुरु होतत.परतेक फांदीक रतांबे लागतत.या झाडार चढाक येकदम सोप्प्या आसता.
रतांबेचे झाडाक फेब्रुवारी मयन्यापासून रतांबे लागाक सुरवात होता. मे मह्यन्यात रतांबे झाडार लालबुंद होऊन पिकतत.
रतांबे काढूसाठी घरातलो येखारदो झिलगो रतांब्याच्या झाडार  परतेक फांदी हलवत चढता. मगे पिकलले रतांबे आपसूक खाली पडतत. घरातली बाईलमानसा नी न्हान पोरा खाली पडलले रतांबे गोळा करतत नी फाटयेत भरान खळ्यात व्हरतत.खळ्यात सगळीजणा टोप घेऊन येकठे बसतत नी रतांबे फोडूक सुरवात करतत. रतांब्यांची साला फाटयेत जमा करतत नी गुलाबी बीयो नी रस मोठ्या मातीच्या मडक्यात गोळा करतत.नंतर तेचेतले बीये चांगले कुवळतत नी  दोन हातान सारखे पिळून बाजूक काढतत. तेंका मगे रखा लाऊन ऊनात सुकवतत.रतांबे सोलून आंगठ्याची नरा उंबाळतत नी लय दुखतत. जास्त येळ रतांबे फोडत बसला की अंगात वात भरता.
मडक्यात जमा झालल्या आगळात लागात तितका खडे मीठ घालून खडे  विरगळेतागत  डवलेन ढवळतत. आत्ताच्या पोरांका डवली माहिती नाय. ती अशी, नारळाची करटी शाप तासून तीका गुळगुळीत करतत.नी ढाणी लालभडक तापवून करटेक दोन निमुळते भोका पाडून त्या भोकातनी फिट बसात अशी लाकडाची काठी घालतत. तेका डवली म्हनतत. पूर्वी सगळ्यांच्या घरात ही डवली  वापरत होते.मगे ती खय  धापू झाली.
आगळाचा मडक्या झाकण ठेऊन येकेबाजूक स्वैन ठेवतत.रतांब्याची सोला डाळीर पघळून घालतत नी तीन दिस हिमरात सुकवतत. तीन हिमरा लावलेनंतर तिसरे दिशी तिनसाना ही सोला आगळात घालून रातसाडी ठेवतत.दुसरे दिशी सकाळी आगळातली सोला येका फाटीत काढून टोपार फाटी पाघळत ठेवतत.मगे परत ती सोला डाळीर पघळून हिमरात सुकत ठेवतत.अधूनमधून ती वरखाली करतत जेनेकरुन सगळ्या सोलांका सारखा  हिमार लागाक व्हया .सांचेक ती सोला फाटयेत भरुन घराक घेऊन येतत नी परत रातसाडी आगळात भिजत घालतत.  हिच क्रिया अजून दोन दिस करतत. 
तीन हिमरा दिल्यानंतर सोला खाऊक तयार होतत.मडक्यात उरलेलो आगळ काचेचे बाटलेतनी घट बुच लावून भरुन ठेवतत. ह्या आगळाक दोन तीन वरसा कायैक होत नाय. जसोचो तसो रवता.
ही सोला आमी भेंडेचे सारात, माश्याच्या सारात, कोकम कढीत, चवीसाठी गोडे डाळीत, तिखट डाळीत, कुळदाच्या मोडवणीत, कुळदाच्या पिठीत, मसुरच्या सांबार्यात,सुरणाच्या भाजीत, अळूच्या भाजीत, अळूच्या गाठयेतनी, सुक्या मच्छीत, मोरीच्या मटनात वापरतव.मासे भाजताना माश्याका आगळ लावतत.अंगार पित्ताचे गांधी उठले तर अंगाक सोला चोळल्यार बरा वाटता नी सोलांनी अन्नाचा पचन नीट होता.
रतांब्यांच्या बियांका रखा लाऊन चार पाच हिमरात सुकवतत .मगे ते  बिये लाकडी टोणक्यान झेजरतत. हे झेजरलेले बिये सुपात घेऊन आसडतत नी सालपाटा येगळी करतत.  ते बिये जमा करुन आठवड्याच्या बाजारात नेऊन इकतत. त्यांका दर चांगलो येता. सोलासुध्दा इकतत. मिळालेल्या पैस्यातसून मिरगाचो बाजार करतत.
 तर दुकानात सोला दिसतत पन झाडावरसून रतांबे काढून तेची सोला बनवूक खूप खटपट आसता नी कोकणी माणूस ही कामा आवडीन करता.या लेखाचा क्रेडीट माझ्या घरवाल्यांका.
इनफारमेशन सोर्स  माझे घरवालै☺️